Resources

छायालेखन नियमावली
निरंजन
भाषाविज्ञान विभाग
मुंबई विद्यापीठ
५ जानेवारी, २०२०

नियमावलीबाबत थोडे
ही नियमावली मुंबई विद्यापीठाच्या भाषाविज्ञान विभागाकडून प्रस्तावित केली जात आहे. डॉ. रेणुका ओझरकर (भाषाविज्ञान विभाग, मुंबई विद्यापीठ) व डॉ. चिन्मय धारूरकर (भाषाविज्ञान विभाग, केरळ केंद्रीय विद्यापीठ) ह्यांच्या मार्गदर्शनामुळे ह्या कामास पूर्णत्व आले आहे. त्याचप्रमाणे ह्या नियमावलीस मुंबई विद्यापीठाच्या भाषाविज्ञान विभागाने अधिकृत ठरवून आपल्या संकेतस्थळावर तिला मुक्त स्वरूपात उपलब्ध करून दिल्यामुळे विभागाचेही ह्या कामात महत्त्वाचे योगदान आहे.

छायालेखन म्हणजे काय?

वरील उदाहरणातील पहिल्या ओळीत केवळ मल्याळम् उच्चार आहेत. त्यांतून मराठी वाचकाला कोणताच बोध होत नाही. त्या मूळ वाक्यातील विविध शब्दांचा व काही कार्यकारी घटकांचा अर्थ कळावा म्हणून वाक्याची छाया दिली जाते. संस्कृत वाङ्मयातल्या छायेत व इथल्या छायेत फरक असा की इथे रूपांची नावे दिली जातात. एव म्हणजे एकवचन, १ म्हणजे प्रथम व्यक्ती, पू म्हणजे काळाचे पूर्णत्व. ह्या पद्धतीने आपल्याला अभिव्यक्तीची बाह्यरेषा कळते, परंतु नेमका अर्थ तरीदेखील कळत नाहीच. त्याकरिता छायेनंतर मुक्तानुवाद दिला जातो. ज्या भाषेत चिकित्सात्मक लेखन होत असते, त्या भाषेत मुक्तानुवाद देणे आवश्यक असते.

भाषाविज्ञानात अपरिचित भाषांतील वाक्ये अनेक वेळा उदाहरण देण्यासाठी वापरावी लागतात. अशा वेळी त्यांचा निजभाषेतील अनुवाद पुरा पडत नाही. त्यातून भाषेतल्या प्रक्रियांचे पुरेसे आकलन होत नाही. ह्यासाठी प्रयोगातील सर्व पदांची फोड करून त्यांचा अर्थ द्यावा लागतो. इंग्रजीत ह्या प्रक्रियेला ग्लॉसिंग असे म्हटले जाते. ग्लॉस ह्या शब्दाचा अर्थ चकाकी, चमक. पाश्चात्त्य परंपरेत अवघड शब्दांच्या अर्थाची “ग्लॉसरी” (संज्ञासूची) देण्याची रीत आहे. इथे ग्लॉस ह्या शब्दामागचे रूपक असे की कठीण शब्दांच्या अर्थावर प्रकाश टाकणारा द्योतक. त्यामुळे पाश्चात्त्य परंपरेतील “ग्लॉसिंग” हे “रूपद्योतन” आहे. रूपद्योतन म्हणजे अवघड भाषिक रूपांवर प्रकाश टाकणे, परंतु भारतीय परंपरेतदेखील अशा स्वरूपाचे रूपक आढळते. संस्कृत वाङ्मयात अपरिचित प्राकृत प्रयोगांचे अर्थ कळावेत म्हणून त्यांची संस्कृत छाया देण्याची पद्धत आहे. त्यामुळे ह्या क्रियेसाठी द्योतनाच्या पाश्चात्त्य रूपकापेक्षा छायालेखन ह्या भारतीय रूपकाचा वापर का करू नये? (धारूरकर चिन्मय, ११ जून, २०२०. व्यक्तिगत संभाषण)

डॉ. धारूरकरांच्या ह्या मताशी मी सहमत आहे. त्यामुळे संस्कृत छायालेखनाचे रूपकच इथे वापरत आहे. अपरिचित रूपांची छाया ही त्या भाषेची बाह्यरेषा स्पष्ट करते. त्यातून अभिव्यक्ती नीट कळेलच असे नाही. अभिव्यक्ती कळण्याकरिता त्यानंतर येणारा मुक्तानुवाद महत्त्वाचा ठरतो. उदाहरणार्थ पुढील वाक्य पाहा.Shortcode

छायेचे मुख्य घटक म्हणजे त्यातील व्याकरणिक नावे. वास्तविक भाषावैज्ञानिक छाया त्यांशिवाय बनूच शकत नाही. त्यामुळे त्यांना “छायांग” म्हणावे. ही छायांगे प्रत्ययांना, उपसर्गांना तसेच सुट्या कार्यकारी शब्दांना लागू शकतात. भाषाविज्ञानाच्या इंग्रजी परंपरेतील रूपद्योतनाचे नियम लायप्चिश् विद्यापीठाकडून दिले गेले आहेत. हे नियम इंग्रजी भाषेत व लॅटिन लिपीतून लिहिणाऱ्या भाषावैज्ञानिकांकरिता लिहिण्यात आले आहेत. मराठी भाषेच्या व देवनागरी लिपीच्या काही निराळ्या गरजा आहेत. आधुनिक भाषावैज्ञानिक पद्धतींचा वापर करून, मराठी वैयाकरणांना मराठीखेरीज इतर भाषांवरही काम करता यावे म्हणून पुढील नियमावली प्रस्तावित करत आहे. लायप्चिश् विद्यापीठाच्या नियमावलीत काही नव्या नियमांची भर घातली आहे. लेखकांच्या गरजांनुसार त्यांना नवी छायांगेदेखील घडवता येऊ शकतात. नवी छायांगे घडवण्याची मुभा असली, तरी संपूर्ण लेखनात ती सातत्याने तशीच वापरली जायला हवीत. अशा प्रकारे छायालेखनाची ओळख करून घेतल्यानंतर आता आपण त्याचे नियम पाहूयात.

नियम १) उच्चारणातील (पहिल्या ओळीतील) प्रत्येक शब्दानंतर खाली दिलेल्या छायेतील शब्द व छायांग ह्यांना लागणाऱ्या जागेइतकी रिकामी जागा सोडावी. उदा.

राम=न्+ई पेन छे[उच्चारण]
३एव राम=संयो-स्त्रीपेन.स्त्री साक्रि[छाया]
हे रामचेपेन आहे.[मुक्तानुवाद]

नियम २) उच्चारणात व छायेत दोन्हीकडे प्रत्ययांचे विभाजन संयोगचिन्हाने (-) करावे. अतिप्रत्ययांच्या विभाजनाकरिता संयोगचिन्ह न वापरता बरोबरची खूण (=) वापरावी. उच्चारण व छायेतील संयोगचिन्हांची संख्या सारखीच असावयास हवी. पदांचे विभाजन करताना जर स्वराचा भाग वेगळा करावा लागत असेल, तर पूर्ण स्वरचिन्ह सुटे लिहावे व त्यापूर्वीच्या व्यंजनाला हलन्ताच्या चिन्हासह दर्शवावे. उदा.

राम्-आ=कआमोआवड-ता[कोंकणी]
राम-आवि=दावि आंबाआवड-अपू.वर्त
रामालाआंबाआवडतो.

नियम २-अ) (वैकल्पिक नियम) उच्चारणाच्या स्तरावर वेगळी भासणारी दोन पदे जर पदस्तरावर एक भासत असतील, तर एका मोकळ्या जागेने त्यांना वेगळे करावे. उदा.
राम -ने                                               [हिन्दी]
राम-कवि

संयोगचिन्हांचा वापर करून लिहिलेले उच्चारण वाचावयास कठीण जात असल्याने अविभाजित व अखंड उच्चारण आधी लिहून त्यानंतरच्या ओळीत विभाजित उच्चारण लिहिलेले चालेल. अशा परिस्थितीत छायालेखन चार ओळींचे होईल.

नियम ३) मजकूर पारंपरिक टंकातील असल्यास छायांगे समरेखा टंकांत लिहावीत, मजकूर समरेखा टंकातील असल्यास छायांगे पारंपरिक टंकांत लिहावीत. समरेखा म्हणजे ज्यांच्या रेघेची जाडी बदलत नाही असे टंक. पारंपरिक टंक म्हणजे ज्यांच्या रेघेची जाडी बोरूने लिहिल्या जाणाऱ्या अक्षराप्रमाणे कमी जास्त होते असे टंक. मुक्तबलूयशोवेणू ही काही समरेखा टंकांची नावे आहेत. तर शोभिकायशोमुद्रागोटू ही काही पारंपरिक टंकांची नावे आहेत. भारतीय भाषांकरिता वारंवार लागणाऱ्या छायांगांची यादी पुढे जोडली आहे. एखाद्या छायांगाचा वापर वारंवार करावा लागत असल्यास त्याचे आणखी संक्षिप्त रूप वापरले जाऊ शकते, परंतु सर्व लेखनात सातत्याने त्याचाच प्रयोग व्हायला हवा. छाया ज्या भाषेत दिली जात आहे त्या भाषेतील शब्द वापरणे स्वीकृत आहे. उदा.

मिची-नीइनु-गाइमास [जपानी]
रस्ता-वरकुत्रा-उविसाक्रि
रस्त्यावरकुत्राआहे.

नियम ४-अ) जेव्हा मूळ भाषेतील एखाद्या शब्दाकरिता छायेमध्ये एकाहून अधिक छायांगे वापरावी लागत असतील तेव्हा छायेत त्यांना बिंदूंनी वेगळे करण्यात यावे. उदा.
पठ-ति                                                 [संस्कृत]
वाच-वर्त.१एव

नियम ४-आ) (वैकल्पिक नियम) मूळ भाषेतील एका अविभाज्य शब्दाकरिता छायेतील भाषेत दोन शब्द असतील तर त्यांना _ ह्या चिन्हाने वेगळे करावे.
वर्क                                                   [इंग्रजी]
काम_करणे

नियम ४-इ) (वैकल्पिक नियम) मूळ भाषेतील एखादा अविभाज्य घटक एकाहून अधिक अर्थ दर्शवणारा असेल, तर ते अर्थ अर्धविराम वापरून नोंदवावेत. उदा.
वो                                                    [हिन्दी]
३एव;बव.पुं;स्त्री

नियम ४-ई) (वैकल्पिक नियम) अखंडपदवादी चिकित्सेप्रमाणे पदांच्या ध्वनिरूपाचे विभाजन करून दाखवायचे नसेल व पदांमध्ये असणारे सुटे अर्थ सोडवून लिहावयाचे असतील, तर अर्थांमध्ये द्विबिंदूचे चिन्ह द्यावे. उदा.
करछि                                           [बाङ्ला]
कर:अपू

नियम ५) जेव्हा व्यक्ती व वचनाची माहिती एकाच घटकातून मिळते तेव्हा त्याला बिंदूने वेगळे करून दाखवू नये. उदा.
हाँव                                                    [कोंकणी]
१एव

नियम ६) पुनरावृत्त शब्दांमध्ये ‘~’ हे चिन्ह वापरावे.
चलते~चलते                                       [हिन्दी]
चालता~चालता

पुं – पुल्लिंग
स्त्री – स्त्रीलिंग
नपुं – नपुंसकलिंग
१ – प्रथम व्यक्ती
२ – द्वितीय व्यक्ती
३ – तृतीय व्यक्ती
एव – एकवचन
द्विव – द्विवचन
त्रिव – त्रिवचन
अव – अल्पवचन
बव – बहुवचन
अवि – अभिधानपर विभक्ती
कर्मवि – कर्मपर विभक्ती
सावि – साधनपर विभक्ती
दावि – दानपर विभक्ती
वियो – वियोगपर विभक्ती
संयो – संबंधयोजक विभक्ती
अधि – अधिकरण विभक्ती
संबो – संबोधन विभक्ती
साह – साहचर्यदर्शक विभक्ती
कवि – कर्तृत्वपर विभक्ती
आवि – आगत विभक्ती
साक्रि – साहाय्यक क्रियापद
गणक – गणक
भूत – भूतकाळ
वर्त – वर्तमान काळ
भवि – भविष्यकाळ
पू – पूर्ण
अपू – अपूर्ण
नि – नित्य
अखं – अखंडित
क्र – क्रमिक
अक्र – अक्रमिक

Latex Class file for MA Dissertations

The students of MA Linguistics (University of Mumbai) are expected to follow a certain style for formatting their dissertations. Those who use LaTeX can now use a LaTeX class called ‘muling‘ (version 0.2) for their dissertations. Thanks to our former student Niranjan Tambe for authoring this class!

Citation and Referencing style

The students and research scholars of the Department of Linguistics, University of Mumbai are advised to strictly follow a certain style for citation and referencing in all of their assignments, term papers, thesis/dissertations submitted to the Department.